Ad will apear here
Next
‘दिवाळी म्हणजे नात्यांचा उत्सव’
८८ वर्षांचे चारुदत्त ऊर्फ चारुकाका सरपोतदार म्हणजे पूना गेस्ट हाउसच्या माध्यमातून अनेक कलाकारांशी जिवाभावाचे नाते जोडलेले पुण्यातले बुजुर्ग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मते दिवाळी हा नात्यांचा, नाती दृढ करण्याचा उत्सव आहे. त्यांच्या ‘आठवणीतली दिवाळी’ अशी आहे... 
.........
चारुदत्त सरपोतदार
खरे तर माझ्या लहानपणी दिवाळी म्हणजे थंडीत भल्या पहाटे केलेले अभ्यंगस्नान, आईने केलेले फराळाचे जिन्नस इतकेच असे. माझे वडील मी पाच वर्षांचा असताना गेले. त्यामुळे मी आणि माझी सहा भावंडे, तीन बहिणी आणि आम्ही चार भाऊ यांना आईनेच वाढवले. त्यामुळे दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांची खरेदी, फटाके असे काही नसायचे. आई भल्या पहाटे आम्हाला उठवून तेल, उटणे लावून कडकडीत पाण्याने आंघोळ घालायची. नंतर ओवाळायची. फराळाचे काही जिन्नस घरीच केले जायचे. नातेवाईकांना फराळाची भेट दिली जात असे. सख्ख्या, चुलत, लांबच्या नात्यातील व्यक्तीदेखील एकत्र दिवाळी साजरी करत. धार्मिक संस्कार, नात्याला महत्त्व होते. पारंपारिक पद्धतीने सण साजरे केले जायचे. 

आमच्या लहानपणी फटाके, आतषबाजी यांचे प्रमाण फार कमी होते. आजच्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम नसायचे. एकमेकांकडे जाणे-येणे, घरात सर्वांनी एकत्र राहून सणाचा आनंद घेणे यावर भर असायचा. आपले सणवार हे याच उद्देशाने निर्माण केले गेले आहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी व्यापारी वहीपूजन करतात. आजही ही प्रथा पाळली जाते; पण त्यामागचा उद्देश होता, की वर्षभराचे हिशेब पूर्ण करायचे. नवीन सुरुवात करायची. 

सासुरवाशिणींना माहेरी येता यावे यासाठी हा सण. मुलीबाळी, नातवंडे यांनी घरे फुललेली असायची. हास्यविनोद, आनंदाने घरे उजळलेली असत. पाडवा हा सण पती-पत्नीच्या नात्यासाठी. दोघांमधील नाते आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात नव्याने फुलवायचे. भाऊबीज बहीण-भावातील नाते दृढ करणारी. भाऊबीजेला बहिणी आम्हा भावंडांना ओवाळायच्या, ओवाळणी फार मोठी नसायची; पण त्या नात्यात प्रेम, आपुलकी मोठी होती. भावाने बहिणींचा पाठीराखा म्हणून कायम पाठीशी उभे राहण्याची हमी त्यातून दिली जायची. ती भावना महत्त्वाची होती. पाडव्याला सासुरवाडीला जावयाचे कौतुक व्हायचे. एकाच दिवशी भाऊबीज आणि पाडवा आल्यास सकाळी पाडवा आणि संध्याकाळी भाऊबीज साजरी व्हायची.

मोठेपणीही याच जिव्हाळ्याने दिवाळीत या नात्यांचा उत्सव साजरा करण्यात येत असे. माझ्या बहिणी मुंबईला होत्या. पाडवा त्याच दिवशी असेल, तर मी सकाळी पाडवा साजरा करून मुंबईला मोठ्या बहिणीकडे, चुलत बहिणीकडे जात असे. माझ्या मानलेल्या बहिणी वसुंधरा पेंडसे, सुलोचनादीदी यांच्याकडे जात असे. आता वयोमानामुळे शक्य होत नाही. म्हणून गेल्या १५ वर्षांत जाणे-येणे कमी झाले आहे; पण तोपर्यंत या नेमात कधी खंड पडला नव्हता. रक्षाबंधनाला वसुंधरा पेंडसे राखी पाठवत असत. त्या जाईपर्यंत त्यात खंड पडला नव्हता. 

सणवाराला या नात्यांचे महत्त्व, पावित्र्य अबाधित राखले जायचे. दिवाळीत अशा प्रत्येक नात्याला एक दिवस आहे. तो त्या नात्याचा सन्मान करत साजरा होई. तेव्हा घरोघरी दिवाळी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, हौसेप्रमाणे साजरी होई. तिचे स्वरूप अगदी घरगुती होते. अगदी कलाकार मंडळीदेखील आपल्या कुटुंबाबरोबर घरीच राहून दिवाळी साजरी करत. चित्रीकरणालाही सुट्टी असे. आता काळानुरूप दिवाळी साजरी करण्याचे स्वरूप बदलले आहे. आता ती सार्वजनिकपणे साजरी होऊ लागली आहे. अर्थात बदल हीच कायम राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे कालाय तस्मै नमः!


(शब्दांकन : प्राची गावस्कर

(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTQBH
Similar Posts
‘ती दिवाळी मनात पक्की’ ‘तेव्हा दिवाळीत कडाक्याची थंडी असायची. प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं. आता ऋतूही बदलले आहेत आणि कपडे, दागिने, वाहने खरेदीचं अप्रूप राहिलेलं नाही पण तरीही ती दिवाळी मराठी माणसाच्या अंतर्मनात पक्की बसलेली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे .... ‘ आठवणीतली दिवाळी’ या सदरात
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
‘दिवाळी म्हणजे साहित्य फराळ’ ‘दिवाळीच्या आठवणींत रमायला कोणालाही आवडतंच. तशीच मीही रमते ती आमच्याकडील साहित्य फराळाच्या आठवणींमध्ये...’ सांगत आहेत ज्येष्ठ लेखिका-पत्रकार अरुणा अंतरकर ... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात .....
साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी पुण्यातील सेवानिवृत्त अध्यापक शशिदा इनामदार यांनी त्यांच्या बालपणीच्या (साठ वर्षांपूर्वीच्या), इस्लामपुरातल्या दिवाळीच्या जागवलेल्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language